छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला.
या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते.
अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राजमुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
जय शिवराय.. जय भवानी !
Comments
Post a Comment